खासदार अमोल कोल्हे अन मावळ्यांनी केली कर्नाटक मोहीम ‘गनिमी काव्याने’ फत्ते 🚩🚩

खासदार अमोल कोल्हे अन मावळ्यांनी केली कर्नाटक मोहीम ‘गनिमी काव्याने’ फत्ते 🚩🚩

बेंगळूरु मधील महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हापासून मनात एक अस्वस्थता होती. योजना आकाराला येत होती, परंतु दिवस ठरत नव्हता. मग एका कार्यक्रमानंतर लोणावळ्याहून पुण्याला जाताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर चर्चा करताना दिवस ठरला- शिवजयंती! त्याचवेळी “सांभाळून!” हा सल्लाही मिळाला.

जसजशी १९ फेब्रुवारी जवळ येऊ लागली तसतशी अस्वस्थता वाढू लागली. कर्नाटक सरकारने आडकाठी केली तर? परवानगी मिळेल का? काही गडबड झाली तर काय परिणाम होतील? आपण एका पवित्र भावनेने जात आहोत, परंतु आपल्या जाण्याने तेथील मराठी रहिवाशांना काही अडचण तर येणार नाही ना? केव्हा जाहीर करावं? जाहीर करून विरोध झाला तर काय पर्याय? असे अनेक प्रश्न, अनेक शंका मनात होत्या. मग ठरवलं वापरायचा गनिमी कावा! तरीही धोका होताच. आजवरच्या सीमाभागातील आंदोलनांचे अनुभव ठाऊक होतेच. इथे तर थेट राजधानीच्या शहरात जायचं होतं. कर्नाटक पोलिसांना कल्पना दिली आणि त्यांनी लगेच होकार दिला, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. जावं की नाही असा संभ्रम तयार झाला. मग सुप्रियाताईंशी चर्चा केली, त्यांच्या ठाम पाठिंब्यावर ठरलं – अब आर या पार अन् निघालो..

 

१८ फेब्रुवारीला होदेगिरी येथे शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन बंगळुरुत दाखल झालो आणि कर्नाटक पोलिसांचा होकाराच्या आड दडलेला चेहरा दिसला. उंदरामांजराचा खेळ सुरू झाला. रात्री उशीरा पोलिस अधिकारी काही स्थानिक मंडळींना घेऊन आले. परिस्थितीच्या संवेदनशीलतेची, स्फोटकतेची कल्पना दिली. आधी सांगण्यात आलं की सकाळी ७ ची वेळ देऊ, मग सांगितलं मुख्यमंत्री येणार आहेत, पुन्हा वेळ बदलली. संयमाची परीक्षा होती.

 

एवढा धोका पत्करून बंगळुरुत आलो होतो. आता मागे हटणं शक्य नव्हतं. सगळी टीम सज्ज होती. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, नगरसेवक आदिल फरास, जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, उद्योजक विशाल जाधव, अमोल हरपळे, मुक्ती ग्रुपचे प्रफुल्ल तावरे, सुरेंद्र भोईटे, डाॅ. घनःश्याम राव, समीर थिगळे, तेजस झोडगे, दत्ता लोखंडे, अमोल कावळे, सुहास लोंढे, विशाल वर्पे, प्रमोद लांडे, तुषार झरेकर, राहुल चांदोरे, प्रथमेश कुलकर्णी आणि इतर सगळे भारल्याप्रमाणे होते. काहीतरी अचाट धाडस करतो आहोत याची प्रत्येकाला कल्पना होती आणि त्यासाठी पत्कराव्या लागणाऱ्या धोक्याचीही..

रात्री १२.३० वाजता पोलिसांशी वाटाघाटी सुरू होत्या आणि ‘युद्धात जिंकलो अन् तहात हरलो’ हे होऊ नये म्हणून जागरूक होतो. अखेरीस दुपारी १ वाजता सदाशिवनगरच्या परिसरातील पुतळ्याकडे निघालो. पुतळ्याच्या परिसरात पोहोचेपर्यंत कोणताही नियम मोडला जाणार नाही याची काळजी घेत होतो. एकदा परिसरात पोहोचलो, त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय! या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि पोलिस यंत्रणा कावरीबावरी झाली. आमच्या टीमने पोलिस अधिकाऱ्यांना सावरू दिलेच नाही. रात्रीच्या वाटाघाटींनुसार आम्ही एकही नियम मोडला नव्हता.

 

पण ज्या पुतळ्याची विटंबना झाली होती, त्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला होता. मी ही भारावून गेलो होतो. त्या भावनेच्या भरात मी स्वतः दिलेली शिवगर्जना आसमंतात दुमदुमली होती! शिवरायांच्या झालेल्या अवमानाचा वचपा काढण्यासाठी आमच्यातील प्रत्येकजण आसुसला होता. त्यामुळे शिवरायांचा जयजयकार टिपेला पोहोचला होता! अशारीतीने कर्नाटक मोहिम फत्ते झाली होती. आता सुखरूप परतीची वाट धरली होती. परत येताना बेळगाव आणि निप्पाणी भागात शेकडो मराठी बांधव स्वागतासाठी थांबले होते. जखमेवर फुंकर घालायला कुणीतरी आलं याचं समाधान त्यांच्या डोळ्यांत होतं. महाराष्ट्रभरातून अनेक शिवभक्तांचे फोन येत होते. प्रत्येक जण अभिमान व्यक्त करत होता.

सुमारे १८०० किमीच्या प्रवासाने शरीर थकलं होतं. मात्र सर्व वाहनचालक न थकता अविरत वाहनं चालवत होते. शरीरं थकली असली तरी थेट बंगळुरूमध्ये जाऊन महाराजांच्या पुतळ्याला सन्मानाने दुग्धाभिषेक करून गारद देण्याचे काम फत्ते करून आल्याचं मनाला समाधान होतं. हे धाडस या धाडसी टीमशिवाय शक्य नव्हतं. मोहिम यशस्वी झाली याचं श्रेय स्वयंप्रेरणेनं सहभागी झालेल्या या प्रत्येक मावळ्याचं आहे. त्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक!

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: