NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; मद्य विक्री परवाना प्रकरण भोवणार?

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे (Thane) शहरातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये (Kopari Police Station) त्यांच्याविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे.   वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. खोटी माहिती देऊन समीर वानखेडे यांनी मद्य विक्रीचा परवाना (Liquor sales license) मिळवला असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. त्यानंतर वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचा परवाना रद्द केला होता. बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. त्यानंतर या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपला अहवाल जिल्हा दंडाधिकारी (DC) यांना सादर केला. ज्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 54 अन्वये कारवाई करुन परवाना रद्द केला.

काय आहे प्रकरण?

“समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढले होते. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने हे परमीट घेण्यात आले. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे सतगुरु बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हा बार आणि रेस्टॉरंट आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: