मोठी बातमी | ठाण्यात लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण

 

ठाणे | लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. त्या राहत असलेल्या इमारतीचा वाढवलेला मेंटेनन्स आणि घरात केलेल्या अंतर्गत कामाच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीनंतर पालव यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली असून याचा तपास केला जात आहे. संबंधित घटना रविवारी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावणीसम्राज्ञी विजया पालव ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीतील रहिवाशांकडून मेंटेनन्स जमा करण्याचं काम बिल्डर करतो. संबंधित इमारतीचा मेंटेनन्स ८०० रुपये होता. पण बिल्डरने मेंटेनन्सच्या रकमेत जवळपास दुप्पट वाढ केली. त्याने ८०० रुपयांवरून थेट १५०० रुपये केला होता.

यामुळे संबंधित इमारतीतील रहिवासी बिल्डरवर संतापले होते. अशात घरफळा रकमेत भरमसाठ वाढ केल्याने विजया पालव आपल्या काही महिला साथीदारांसह जाब विचारण्यासाठी संबंधित बिल्डरकडे गेल्या होत्या. यावेळी बिल्डरसोबत वाद झाल्यानंतर, ‘तुम्ही घरातील अंतर्गत काम कोणाला विचारून केलं?’ असा उलट सवाल बिल्डरने पालव यांना विचारला. यानंतर झालेल्या वादावादीनंतर बिल्डरच्या गटातील काही महिला आणि पालव यांच्यासोबत गेलेल्या काही महिलांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत लावणीसम्राज्ञी विजया पालव जखमी झाल्या आहेत.

Team Global News Marathi: