“मोदी पंतप्रधान असल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही”

 

नवी दिल्ली | गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता प्रचाराचं बिगुल वाजायला सुरवात झाली आहे. आगामी काळात गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून केवडिया येथे दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीस आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली होती.

नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. तसेच देशातील जवानांप्रती काँग्रेस संवेदनशील नसल्याचाही आरोप करताना त्यांनी ४० वर्ष “वन रँक-वन पेन्शन” हा प्रश्न सोडवला नाही, असेही ते म्हणाले.

भारतात आम्ही दहशतवाद्यांना थारा दिला नाही. काश्मीर विषय तर काही बोलूच नका. देशात भाजपची सत्ता आल्यापासून एकही दहशतवादी हल्ला झाला नाही आहे. हे आमचं मोठं यश म्हणाव लागेल. उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देऊन जगाला ठणकावून सांगितलं आहे की आमच्या देशात दहशतवाद्यांची काही खैर नाही, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: