मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती

 

मारियुपोल शहरामध्ये झुंज देणारे युक्रेनच्या आणखी शेकडो सैनिकांनी रशियाच्या लष्करापुढे शरणागती पत्करली असून अशा सैनिकांची संख्या आता १७३० झाली आहे. त्यातील जखमी सैनिकांसह अनेकांना रशियाने कैद केल्याचे रेड क्राॅस या संस्थेने म्हटले आहे. युद्धकैदी बनलेल्या युक्रेन सैनिकांच्या नावांची नोंदणी रेड क्राॅस संस्थेने मंगळवारपासून सुरू केली.

या दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार रेड क्राॅस हे काम करीत आहे. युद्धकैद्यांसंदर्भातील प्रकरणे हाताळण्याचा रेड क्रॉस संस्थेला मोठा अनुभव आहे. मारियुपोलमधील युद्धकैद्यांना कुठे ठेवण्यात आले आहे हे या संस्थेने जाहीर केलेले नाही. त्यात अनेक जखमी सैनिकही आहेत. अझोवत्साल स्टील प्रकल्पाच्या आडोशाने युक्रेनचे सैनिक रशियाच्या लष्कराशी झुंज देत होते. मात्र त्यांना प्रतिकार थांबविण्याचे आदेश त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर तेथील युक्रेनच्या सैनिकांपैकी अनेकजण रशियाला शरण आले.

रशियाने या स्टील प्रकल्पावर सातत्याने बॉम्बहल्ले करून तो उद्ध्वस्त केला आहे. युक्रेनच्या सैनिकांचा हा शेवटचा बालेकिल्ला नष्ट केल्याशिवाय त्या शहरावर रशियाला संपूर्ण ताबा मिळविणे शक्य नाही. शरण आलेले सर्व सैनिक रशिया आमच्या सुपुर्द करतील, अशी आशा युक्रेनने व्यक्त केली.

Team Global News Marathi: