बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहरमामा भोसलेला साताऱ्यातून अटक

अखेर भोंदू मनोहरमामा भोसलेला बारामती पोलिसांनी केली अटक

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहरमामा भोसलेला साताऱ्यातून अटक

बारामती, 10 सप्टेंबर : श्री बाळू मामांचा (Saint Balu Mama)  अवतार असल्याचे सांगत 2 लाख 50 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोहर मामा ऊर्फ मनोहर भोसले (Manohar Mama Bhosale) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मनोहरमामाला बारामती पोलीस (manhoar mana) आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे.

मनोहर भोसले याला सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला बारामतीत आणण्यात आलं आहे.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा व उच्चाटन कायदा तसंच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीतील शशीकांत सुभाष खरात याच्या वडलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत  मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो, असं सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल

तर दुसरीकडे, आजच सोलापूरमध्ये एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित महाराज मनोहर भोसले याच्यासह त्याचे साथीदार नाथ बाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भादवि कलम 376, 385,506 तसेच जादुटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिघांनी तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला होता.  त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती. अखेर मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: