महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचा मोदींविरोधात शड्डू

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला वाराणसीतून आव्हान देण्याची तयारी

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे वक्तव्य खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावी म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेना पक्षाला राम-राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केली होती. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला.

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा ४५ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: