महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला शब्द !

 

नवी दिल्ली | महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढचे पाऊल आणि दिल्ली अधिकारी या संस्थेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचा नितीन गडकरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री गडकरी यांच्याहस्ते नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, “मी अपघाताने दिल्लीत आलो असलो तरी, नवीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तुकरिता जमीन मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न होते. आज इथे छगन भुजबळ यांनी भव्य वास्तू उभारली आणि याच वास्तूत नवीन केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार होतो आहे, याचा आनंद होतो.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे दिल्लीत महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच दिल्लीत मराठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आहेत. मराठी मुले उच्च पदावर यावीत, ही त्यांची तळमळ मी अनेक वर्षांपासून पाहतोय. पुरामुळे महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्याची अलीकडे वाताहत होताना दिसते.

केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Team Global News Marathi: