कर्नाटकात भाजप मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्याला आपल्या गाडीने उडवले |

 

कर्नाटक | कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जात असताना या शेतकऱ्याला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा मुलगा चिदानंद सवदी यांच्या गाडीने उडवले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-५० वर कुडाळसंगमा चौकाजवळ हा अपघात झाला होता. अपघाताचे ठिकाण हे हुनगुंड शहराजवळ आहे. या अपघातात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याचं नाव कुदलप्पा बोळी असा असून सदर शेतकरी आपले काम आटपून घराकडे परतत होता.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की एमजी कंपनीची ग्लॉस्टर ही गाडी भरधाव वेगात होती. ही गाडी अथनीहून बेळगांवकडे चालली होती. कुदलप्पा बोळी हे शेतातील कामं आटोपून घरी चालले असताना त्यांची दुचाकी सवदी यांच्या गाडीने उडवली होती. पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांनी इंडीयन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की कुदलप्पा यांचा मुलगा हनुमंत याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सगळ्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले आहे.

कुदलप्पा बोळी यांचा जावई मंगलप्पा याने आरोप केला आहे की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा चिदानंद सवदी हा गाडी चालवत होता. अपघात झाल्यानंतर कुदलप्पा ही जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यांना चिदानंद किंवा त्यांच्यासोबत असलेल्यांनी वैद्यकीय मदत मिळवून देण्यसाठी काहीही हालचाल केली नाही असा आरोपही मंगलप्पा यांनी केला आहे.

Team Global News Marathi: