कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी

 

राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यांना न्यायालयातून पोलीस परत नेत असताना संतप्त वकिलांनी आरोपींना मारहाण केली. तसेच या वकिलांनी न्यायालयाच्या आवारात जमून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘कन्हैयालाल के हत्यारोंको फांसी दो’ अशा घोषणा दिल्या.

भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी विशिष्ट धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे समर्थन करणारा मजकूर सोशल मीडियावर झळकविल्यामुळे टेलर कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली. कन्हैयालाल हत्या प्रकरणात रियाझ अख्तरी व घौस मोहम्मद यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती.

या कटामध्ये सहभागी असलेल्या मोहसिन, आसिफ या आणखी दोन आरोपींना गुरुवारी रात्री अटक झाली होती. या चारही आरोपींना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयातून पोलीस परत नेत असताना संतप्त वकिलांनी त्यांना मारहाण केली.

 

कन्हैयालाल यांच्या हत्येचे समर्थन समाजमाध्यमांवर करणाऱ्या व्यक्तीला आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातून अटक करण्यात आली.समसूल लस्कर असे त्याचे नाव आहे. समसूलविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते मिलन दास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Team Global News Marathi: