जम्मूमध्ये पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निघाला भाजप आयटी सेलचा प्रमुख

 

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडकलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यामुळे भाजपची चिंता वाढणार आहे. या दहशतवाद्याचं नाव तालिब हुसैन शाह असं आहे. त्याला ९ मे २०२२ रोजी भाजपाने लेटरहेड जारी करत जम्मू विभागाचा भाजपाचा आयटी सेल प्रमुख बनवलं होतं. एवढंच नव्हे तर, दहशतवादी तालिब हुसैन शाहचे जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांसोबतचे फोटोही समोर आले आहेत.

जम्मूच्या रियासी भागात हे दहशतवादी लपून बसले होते, येथील गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या दहशतवाद्याकडून दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान शाह यांच्या नियुक्तीच्या वेळी जम्मू आणि काश्मीरच्या भाजपा अल्पसंख्याक आघाडीने एक आदेश जारी केला होता. संबंधित आदेशात म्हटलं की, “श्री तालिब हुसैन शाह यांची तातडीने राजोरी जिल्ह्याच्या द्रज कोटरांका, बुढानचे नवीन आयटी सेल प्रमुख आणि सोशल मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती केली जात आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तालिब हुसैन शाह हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कासिमच्या संपर्कात होता. अलीकडच्या काळात राजौरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तीन घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय नागरिकांच्या हत्या आणि ग्रेनेड स्फोट घडवण्यात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Team Global News Marathi: