शिराळ(टे)च्या संजय काळेच्या खुनाच्या कटात मुलासोबत पत्नीचाही सहभाग;आठ दिवसांची पोलीस कोठडी

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे (वय 55) याच्या खुनाच्या कटामध्ये मृत संजय काळे याची पत्नी अंजना संजय काळे (वय 45) ही देखील सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी सायंकाळी टेंभुर्णी पोलिसांनी तिला अटक करून माढा न्यायालयासमोर हजर केले असता, तिला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढ्याचे न्यायदंडाधिकारी यांनी दिल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी यापूर्वी संजय काळे याचा मुलगा आकाश काळे त्याचे सहकारी लक्ष्मण बंदपट्टे, अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी या तिघांना अटक केली आहे. 

पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले, की संजय काळे यांचे चारित्र्य वादग्रस्त होते व तो नेहमी घालून-पाडून बोलत होता. त्यामुळे पत्नी अंजना काळे व मुलगा आकाश काळे या दोघांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी संजय काळे याचा खून करण्याचा कट रचला होता.

तो तडीस नेण्यासाठी पत्नी अंजना काळे हिने घटनेच्या आदल्या दिवशी कपाटातून दहा हजार रुपये काढून मुलगा आकाश काळे याला दिले होते. आकाशने सराईत गुन्हेगार लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे, अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी या साथीदारांशी संगनमत करून वडील संजय काळे याच्या खुनाचा कट रचला. खून करण्यासाठी लक्ष्मण बंदपट्टे यास अंजना काळे यांनी दिलेल्या पैशातून रोख सात हजार रुपये दिले.

यानंतर शनिवारी (25 जुलै) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या तिघांनी घरी येऊन अंगणामध्ये झोपलेल्या संजय काळे याचा तलवार व कोयत्याने तोंडावर व गळ्यावर वार करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी टेम्पोखाली त्याचा मृतदेह टाकून टेम्पो जाळला होता. 

चौकशीमध्ये आकाश काळे याने खून केल्याची कबुली दिल्यानंतर लक्ष्मण बंदपट्टे व अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम मुलाणी यांना अटक केली. पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये संजय काळे याची पत्नी अंजना काळे ही देखील या खुनामध्ये सहभागी असल्याचे समोर आले.

त्यामुळे अंजना काळे हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने खुनाच्या वेळी हजर असल्याचे सांगून कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली, असे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. 

Involvement of wife and son in the murder plot of Sanjay Kale of Shiral (Te)

ग्लोबल न्युज नेटवर्क: