भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी विजय ; मालिकेत 1- 0 ने आघाडी

भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सुरुवातीला बेअरस्टो-रॉय जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान बेअरस्टोने अर्धशतक झळकावले. 14 व्या षटकापर्यंत इंग्लंडने बिनबाद 135 धावा कुटल्या. त्यानंतर कृष्णाने रॉयला माघारी धाडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट साजरी केली. रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रॉयनंतर आलेला बेन स्टोक्सही झेलबाद झाला. मॉर्गन-बेअरस्टो जोडीने दबाव झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात बेअरस्टोने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला. बेअरस्टोने 66 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 94 धावांची खेळी केली. बेअरस्टोनंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने भारतासाठी सलामी दिली. या दोघांनी संयमी सुरुवात केली. रोहितने 42 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावांची संथ खेळी केली. यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत शिखर धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली.

 

सामन्याच्या 24व्या षटकात या दोघांनी भारताला शंभरीपार नेले. तर, याच षटकात धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. 25 षटकात भारताने 1 बाद 117 धावा अशी मजल मारली. धवनच्या अर्धशतकानंतर विराटनेही झटपट अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला बाद केले. विराटने 6 चौकारांसह 56 धावांची खेळी केली.

 

स्टोक्सला फटका खेळताना धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. धवननंतर आलेल्या हार्दिक पंड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एक धाव काढून बाद झाला. हार्दिक पंड्या स्टोक्सचा तिसरा बळी ठरला. आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली.

 

त्यांतर आज वनडे पदार्पण केलेला कृणाल पंड्या संघासाठी धावून आला. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 तर, राहुलने 43 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: