पहिल्याच आठवडय़ात राज्य पोलीस दलातील १,६५७ जण करोना बाधीत

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य पोलीस दलातील १,६५७ जण बाधीत झाले आहेत. पोलीस दलात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.आतापर्यंत राज्य पोलीस दलातील १७,०९१ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १३,८५१ जण करोनामुक्त झाले.

राज्यभरात ३,०६४ पोलीस उपचार घेत आहेत. १७६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान पोलीस दलातील बाधितांचा आकडा १,६५७ ने वाढला. त्यापैकी १९ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरात ५११ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले.

एकाच दिवशी इतक्या मोठय़ा संख्येने पोलिसांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनाबाधितांमध्ये मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांची संख्या जास्त होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण बदलल्याचा दावा मुंबईचे नवे सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी केला.

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात जनजीवन पूर्ववत होत असून, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. गणेशोत्सवाआधी खरेदीसाठी आणि अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी होती. पोलिसांची नियमित कामे वाढू लागल्याने पोलिसांमधील बाधा वाढली असा अंदाज आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: