एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे! मिठी नदीतून काढले प्रिंटर, हार्ड डिस्क आणि नंबर प्लेट

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) रविवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना मिठी नदीवर नेले. एनआयएने 12 सफाई कर्मचाऱयांच्या मदतीने चार तास शोध मोहीम हाती घेऊन मिठी नदीतून संगणकाचा सीपीयू, हार्ड डिस्क, डीव्हीआर, नंबर प्लेट, लॅपटॉप, प्रिंटर अशा वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या त्या वस्तू वाझेंनी पुरावे नष्ट करण्यासाठी मिठी नदीत फेकल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्ये प्रकरणी एनआयए तपास करत आहेत. तपासा दरम्यान रोज नवनवीन सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एनआयएने आता जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. रविवारी दुपारी एनआयएच्या पथकाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना बीकेसी येथील मिठी नदीवर नेले. पोलीस बंदोबस्तात सफाईचे काम करणाऱया 12 जणांना मिठी नदीत उतरवले गेले.

कामगारांनी मिठी नदीतून एक लॅपटॉप, दोन कॉम्पुटर, डीव्हीआर, हार्ड डिस्क, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेटस बाहेर काढल्या. जवळपास चार तास शोध मोहीम सुरु होती. दरम्यान मिठी नदीतून बाहेर काढलेले लॅपटॉप, हार्ड डिस्क हे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

ती नंबर प्लेट चोरीच्या गाडीची

एनआयएने मिठी नदीतून दोन नंबर प्लेट बाहेर काढल्या आहेत. त्यातील एक नंबर प्लेट ही संभाजी नगर येथील एका जणांच्या वाहनांची असून ते वाहन गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चोरीला गेले होते. वाहन चोरी प्रकरणी त्या मालकाने चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: