मुंबई इंडियन्स रचला इतिहास; पाचव्यांदा आयपीएल चे जेतेपद पटकावले

आयपीएल २०२० मध्ये मंगळवरी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सन संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या दमदार खेळीनं समाधानकारक पल्ला गाठला खरा, परंतु मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं तुफान फटकेबाजी केली. रोहितनं आजच्या अंतिम सामन्यात लय भारी विक्रमांची नोंद केली.

मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या.

समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी’कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसनं पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( २०) बाद केले. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी मुंबईनं २०१५च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ६१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: