मुंबईत पावसाचा धुमाकूळ : मुसळधार पावसामुळे नाल्यात दोन घरे कोसळल्याने पाचजण वाहून गेली

मुबई: सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात मुसळधार पावसामुळे दोन घरे नाल्यात कोसळल्याने या घरातील पाचजण नाल्यात पडले. त्यातील एका महिलेसह दोन मुली पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांना शोधण्याचा अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला आहे. तर नाल्यात वाहून जाणाऱ्या एका लहान मुलाला आणि मुलीला वाचवण्यात यश आले आहे.

आज सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी ही घटना घडली. वाकोला येथील अग्रीपाडा परिसरातील धोबीघाटात असलेल्या त्रिमूर्ती चाळीतील दोन घरे पावसामुळे नाल्यात कोसळली. या चाळीतील रुम नंबर ६९४ आणि ६९५चा अर्धा भाग कोसळला. मात्र, पावसाचा जोर अधिकच वाढल्याने ६९४ क्रमांकाच्या घराचे छत पूर्णपणे कोसळले. हे घर नाल्याला लागूनच होते. त्यामुळे घर नाल्यात कोसळले.

या घरात एक महिला आणि तीन मुली होत्या. हे चारही जण पाण्यात कोसळल्याने स्थानिकांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. स्थानिकांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले असता पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून एका मुलीला वाचवले. मात्र, एक महिला आणि दोन मुली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांना शोधण्याचं काम करत आहेत. वाचवण्यात आलेल्या मुलीला व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहे.

या तिघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाने एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी येण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या दोन्ही घरांबरोबर एक लहान मुलगाही नाल्यात पडला होता. एका तरुणाला हा मुलगा वाहून जात असल्याचं दिसल्यानंतर त्याने कसलाही विचार न करता तात्काळ नाल्यात उडी मारून या मुलाला वाचवलं. या मुलाला व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या मुलाच्या नाकातोंडात आणि पोटात पाणी गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे.

हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला असून नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: