गुजरातमध्ये पावसामुळे हाहाकार, जागोजागी पाणी तुंबले, नागरिकांचे प्रचंड हाल

 

महाराष्ट्रासह देशभरातील 25 राज्यांमध्ये धुवाधार पाऊस सुरू असून गुजरातमध्ये हाहाकार उडाला आहे. अहमदाबाद, सुरतसह अनेक शहरांत पाणी तुंबल्याने नागरिक बेहाल झाले आहेत. राजकोटच्या रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतापर्यंतचा मृतांचा आकडा 65 वर पोहचला आहे. पावसामुळे येथील परिस्थिती बिकट बनलेली असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. नागरिकांना मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

गुजरातमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू असून एका दिवसात अहमदाबाद शहरात 219 मिलीमीटर, तर सहा तासांत कच्छच्या अंजार तालुक्यात 167 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रमुख मार्गांसह रहिवासी भागात मोठय़ा प्रमाणात पाणी भरले आहे. पाऊस थांबल्यानंतरही शहरातील पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक घरातच अडकून पडले आहेत. 27 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

गुजरातप्रमाणेच मध्य प्रदेशातही तुफान पाऊस आहे. भोपाळमध्ये गेल्या 48 तासांत 9 इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. इंदूर शहरातही हीच परिस्थिती आहे. सोमवारी छिंदवाडाच्या सौंसर परिसरात 9 इंच, विदिशा येथे 8 इंच, अलीराजपूर येथे 7 इंच तर पिपरिया येथे 6 इंच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

Team Global News Marathi: