चोरीला गेलेल्या 24 दुचाकी जप्त, कॉम्प्युटर इंजिनियरसह चौघांना अटक

ग्लोबल न्यूज – शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाहन चोरांना शोधून काढण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शहराच्या विविध भागांतून वाहन चोरी करणाऱ्या अशा चौघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अटक चोरटे शिक्षित असून त्यापैकी एकजण कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

आकाश केरनाथ बधे (वय 22, रा. फातीमा नगर, आदर्श नगर, मोशी, शिक्षण – कॉम्प्युटर इंजिनियर), विलास बाळशिराम मोरे (वय 35, रा. संतनगर सेक्टर नंबर 4 मोशी प्राधिकरण, मोशी, शिक्षण – बीए), अक्षय अभिमान जाधव (वय 21, रा. एमआयडीसी, भोसरी, शिक्षण – दहावी) व ऋषिकेश शांताराम पिंगळे (वय 21, रा. नारोडी ता. आंबेगाव, जि. पुणे), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपरी चिंचवड परिसरातील विविध भागांतून वाहन चोरी करत होते. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण व अमंलदार यांचे पथक तयार केले. या पथकाने तपास करून या आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याविरोधातील एकूण 17 गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून 16 लाख किंमतीच्या 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: