शेतकऱ्यांचा २५ सप्टेंबरला भारत बंद; पाच सप्टेंबरपासून मिशन उत्तरप्रदेश सुरू

नवी दिल्ली | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात जन आंदोलन सुरु आहे. मात्र या कायद्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाला दहा महिने पूर्ण होत असल्याने २५ सप्टेंबरला भारत बंद पाळण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केला आहे.

हरियाणाच्या नूह येथे किसान महासभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंग यांनी हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीची कोंडी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. दिल्लीला पूर्णपणे घेरण्याचे आवाहन आम्ही लवकरच करणार आहोत. सध्या दक्षिण हरियाणात आम्ही पोहोचलो नाही. पण लवकरच तेथेही आंदोलनन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

मुझफ्फरनगर महापंचायतीत पाच सप्टेंबरला आमची उत्तर प्रदेश मोहीम सुरू होईल. प्रत्येक तालुका आणि गावात किसान मोर्चाची शाखा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, पाच सप्टेंबरला होणारी मुझफ्फरपूर महापंचायत सर्व देशातील नागरिकांसाठी खुली आहे. मेवातचे शेतकरी उत्तर प्रदेशात जाऊन सर्व तयारी करतील.

Team Global News Marathi: