…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील! राहुल गांधी यांचा हल्लाबोल

जो विरोधात बोलतो, विरोधात उभा राहतो त्याच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीचे बोलतात. शेतकरी आंदोलन करत आहेत, तर शेतकऱयांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर मजुरांना देशद्रोही ठरवून दहशतवादी म्हटले जाईल. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत हे जरी विरोधात उभे राहिले, तर त्यांनाही मोदी दहशतवादी ठरवतील, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी 29 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱयांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडविला आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि सोडून देण्यात आले. काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या शिष्टमंडळास राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले.

राहुल गांधी काय म्हणाले

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, तीन कृषी कायदे शेतकऱयांना मान्य नाहीत. त्यामुळेच शेतकरी 29 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, हे सरकारने लक्षात ठेवावे.

मोदी सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करावेत.
कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर केवळ भाजप, संघाला नाही तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल. शेतकरी उद्ध्वस्त होईल.
देशात लोकशाही राहिलेली नाही. केवळ कल्पनेतील लोकशाही उरली आहे.

देशातील शेतकरी मजुरांसमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही.मोदींविरोधात जो उभा राहील, जो विरोधात बोलेल त्याला दहशतवादी म्हटले जाते. सरसंघचालक मोहन भागवत जरी विरोधात बोलले, तर त्यांनाही मोदींकडून दहशतवादी म्हटले जाईल.

पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील शेतकऱयांशी बोलणार

कृषी कायद्यांविरोधात कडाक्याच्या थंडीत 29 दिवसांपासून लाखो शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. मात्र, या शेतकऱयांशी थेट बोलण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपशासित राज्यातील शेतकऱयांशी संवाद साधत आहेत. आज शुक्रवारी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील शेतकऱयांशी बोलणार आहेत. गेल्या आठवडय़ात मध्य प्रदेशातील शेतकऱयांशी त्यांनी संवाद साधला होता.

प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

राष्ट्रपती भवनाकडे निघालेला काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंदिरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि डीटीसी बसमधून माघारी पाठविण्यात आले. पोलिसांनी रोखल्यानंतर प्रियांका गांधी-वढेरा यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.

 

संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होईल. फक्त चार-पाच उद्योगपतींच्याच फायद्यासाठी हे कायदे बनवले आहेत. मजूर, शेतकरी मागे हटतील असा विचार पंतप्रधानांनी करू नये. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. सरकारने संयुक्त अधिवेशन बोलावून हे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी राहुल यांनी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: