हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट; भारतासह इतर देशांनाही धोका

नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये हिमनग कोसळून हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढविणारे संशोधन पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. वाढत्या तापमानामुळे २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट झाला आहे. दरवर्षी हिमनद्या साधारणपणे दीड फूट वितळत असल्याने भारतासह विविध देशांतील लाखो लोकांवर परिणाम होण्याचा इशारा या संशोधनात देण्यात आला होता.

‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार २००० पासून हिमनद्या वितळण्याचा वेग १९७५ ते २००० च्या तुलनेत तापमानवाढीमुळे दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला. भारत, चीन, नेपाळ, भूतान या देशांतील तब्बल ४० वर्षांच्या उपग्रह निरीक्षण विश्लेषणाआधारे हा भयावह निष्कर्ष काढण्यात आला होता.

संशोधकांना हिमालयासह आशियातील पामिर, हिंदुकुश आदी पर्वतरांगांतील हिमनद्याही याच गतीने वितळत असल्याचे आढळले. पेयजलासह सिंचन, जलविद्युत निर्मितीसाठी हिमनद्यांवर तब्बल ८० कोटी लोकसंख्या अवलंबून आहे.

या संशोधनात हिमनद्यांशी संबंधित संपूर्ण प्रदेशातील उपग्रह निरीक्षणासह माहिती एकत्र करण्यात आली. विविध ठिकाणांमधील तापमानात फरक असला तरी १९७५ ते २००० च्या तुलनेत २००० ते २०१६ या काळात तापमात सरासरी एक अंशांने वाढ झाली.

कसे केले संशोधन?
संशोधकांनी पश्चिम ते पूर्व दिशेतील दोन हजार कि.मी.मधील ६५० हिमनद्यांच्या उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण केले. यात २० व्या शतकात अमेरिकी गुप्तचर उपग्रहांनी काढलेल्या प्रतिमांचाही समावेश आहे. संशोधकांनी स्वयंचलित प्रणालीच्या मदतीने या प्रतिमांचे ३ डी नमुन्यांत रुपांतर केले. त्यामुळे, हिमनद्यांच्या बदलत्या उंचीवर प्रकाशझोत पडला. त्यानंतर, संशोधकांनी अत्याधुनिक उपग्रहांच्या मदतीने २००० नंतर घेतलेल्या प्रतिमांशी तुलना केली. त्यात १९७५ ते २००० या काळात या प्रदेशातील हिमनद्या दरवर्षी ०.२५ मीटरने वितळत होत्या. त्यानंतर, २००० मध्ये त्या दरवर्षी अर्ध्या मीटर वेगाने वितळू लागल्या. त्यानंतरही, हा वेग वाढतच गेला.

“गेल्या काही वर्षांमध्ये हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या चार दशकांमध्ये हिमनद्यांनी आपल्या प्रचंड वस्तुमानांपैकी एक तृतीयांश वस्तुमान गमावल्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे हिमनद्याही सातत्याने वितळत आहेत.”
जोशुआ मॉरर, पीएच.डी.विद्यार्थिनी, कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका

ग्लोबल न्युज नेटवर्क: