असे केल्यास कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते; मोदी सरकारने सांगितला मार्ग

नवी दिल्ली, 22 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर (Corona second wave) नियंत्रण मिळवल्यानंतर तिसऱ्या लाटेची (Corona third wave) भीती व्यक्त केली जाते आहे. या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण वेगाने केलं जातं आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा मार्ग मोदी सरकारने दिला आहे.

कोरोना लस आणि कोरोना नियमांचं पालन या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr V K Paul) यांनी सांगितलं, “जर आपण कोरोना नियमांचं नीट पालन केलं आणि कोरोना लस गेतली तर तिसरी लाट येईलच का?

जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल. असे अनेक देश आहेत, जिथं कोरोनाची दुसरी लाट आली नाही. जर आपण कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केलं तर हा कालावधी निघून जाईल”

पुढील 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट

देशात पुढील 6 ते 8 आठवड्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. पण सध्या देशातील अवघ्या 5 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे देशाला तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असून कोरोना संसर्ग रोखणं अवघड आहे. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांचा फज्जा उडवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून नागरिकांनी कोणताच धडा घेतला नसल्याचं मतही गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. कोरोना लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच नागरिकांनी गर्दी करायला सुरू केली आहे. याचा मोठा फटका देशाला बसू शकतो, असं गुलेरिया म्हणाले.

तिसरी लाट येणार नाही – विषाणूतज्ज्ञांचा दावा

पण विषाणू तज्ज्ञांनी मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निराधार आहे. देशात कोरोना संक्रमण वाढण्याबाब कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

न्यूज 18 ने अमेरिकेतील विषाणू तज्ज्ञ डॉ. टी. जॅकब आणि डॉ. रवी गोडसे यांच्याशी भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मोठा दिलासा दिला आहे.

तर डॉ. रवी गोडसे म्हणाले, “कोरोना प्रकरणं येतील पण लाट येणार नाही. घाबरू नका. हिंमत ठेवा. 1 जुलैला अंत होणार. भीतीमुळे प्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. संपूर्ण भारतात 2 ऑक्टोबरपर्यंत चेहऱ्यावरील मास्कही उतरतील”

ग्लोबल न्युज नेटवर्क: