दिवाळीच्या तोंडावर मुंबईतून सुमारे तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

 

दिवाळीच्या तोंडावर मुंबईतून सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे.मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला 18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली.

गोदामातून 2 लाख 99 हजार 90 रुपये किंमतीचा 400 किलो तूप जप्त करण्यात आला आहे. यासोबतच तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदाही घेतला जातो. यामुळे या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासून किंवा शुद्ध तुपापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नसते. अशातच व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त आणि बनावट पदार्थ ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. या वस्तूंमुळे आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

Team Global News Marathi: