धक्कादायक | शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या

 

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या करण्यात आली आहे. २८ वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार २७ ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं.

अखेर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. २९ ऑगस्ट रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी अर्धा किलोमीटर अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली.

Team Global News Marathi: