शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर व साखर कारखान्याचे चेअरमन विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे बार्शी न्यायालयाचे आदेश

शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर व साखर कारखान्याचे चेअरमन विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बार्शी (प्रतिनिधी)- तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे यांचे नांवे बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी, ता. बार्शीचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शीचे शाखाधिकारी यांचेशी संगनमत करुन श्रीहरी शिंदे या शेतकऱ्याऐवजी त्रयस्त इसमास उभा करुन, बनावट सहया करुन व श्रीहरी शिंदेचे बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी येथील बँकेत बनावट कागदपत्रे तयार करुन, बनावट कागदपत्रे तयार करुन श्रीहरी शिंदेच्या नांवे कर्ज खाते नं. ०७१४७६३१०००३४६५ अन्वये रणजितसिंह बबनराव शिंदे यांना सदरची रक्कम श्रीहरी शिंदे यांच्या कर्ज खातेवर मंजुर करुन शाखाधिकारी यांनी परस्पर तीन लाख रुपये अदा केलेले आहेत.

सदर बनावट कर्जप्रकरणास रणजितसिंह बबनराव शिंदे हे जामीनदार राहिले आहेत आणि श्रीहरी शिंदे या शेतकऱ्याचे नांवे बनावट कर्जप्रकरण तयार करुन कर्जही जामिनदारालाच दिलेले आहे. याबाबत शेतकरी श्रीहरी शिंदेस काहीएक कल्पना दिलेली नव्हती, मात्र बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी यांनी बँकेच्या वकीलामार्फत दि. ०३/०९/२०१९ ला श्रीहरी शिंदे यांना थकित कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम तीन लाख त्र्यान्नव हजार दोनशे तीन रुपये भरण्याबाबत नोटीस पाठविली त्यावेळी श्रीहरी शिंदेनी बँकेत जाऊन चौकशी केली असता वरील सर्व प्रकार त्यांचे लक्षात आला.

त्यांनतर श्रीहरी शिंदेनी रणजितसिंह शिंदे यांचेकडे सदर कर्जाचे रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी ता. १८/०२/२०२० ला जावक क्र. बी.एस.एस.ए.आय.ए.एल/अकाऊंट/६३०/ २०१९-२०२० चे पत्र देऊन कर्ज व थकित रक्कम व्याजासह ८ (आठ) दिवसांत भरण्याचे कबुल केले व तसे पत्र दिले. त्यानंतरही रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी सदर कर्जाची रक्कम भरलेली नाही. सदरच्या गैरप्रकारामुळे शेतकरी श्रीहरी शिंदे यांना त्यांच्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षण देण्याकरिता आय. डी. बी. आय. बँक, शाखा आगळगांव, ता. बार्शी यांचेकडून कर्ज मिळु शकले नाही म्हणून शेतकरी श्रीहरी शिंदे यांनी ता. ०३/११/२०२० ला बार्शी शहर पोलिसांत रीतसर तक्रार दिली.

 

मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणुन श्रीहरी शिंदेनी ता. ०७/११/२०२० ला मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, बार्शी व मा. पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, सोलापूर यांचेकडे तक्रार दिली मात्र तरीही सदर शेतकऱ्याची दखल कोणीही घेतली नाही म्हणून शेतकरी श्रीहरी शिंदे यांनी ॲड. श्री. आर. यू. वैदय, बार्शी यांचेमार्फत फौजदारी न्यायालय, बार्शी येथे शाखाधिकारी, बँक ऑफ इंडिया, शाखा – ढगे मळा, बार्शी. रणजितसिंह बबनराव शिंदे, चेअरमन/मॅनेजिंग डायरेक्टर, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज, तुर्कपिंपरी, ता. बार्शी व त्रयस्त अनोळखी इसम यांचे विरुध्द भा.द.वि. कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली.

त्या खाजगी फिर्यादीमध्ये बार्शी येथील मा. श्री. आर. एस. धडके साहेब यांनी ता. २१/०१/२०२१ रोजी सी. आर.पी.सी. कलम १५६ ( ३) प्रमाणे बार्शी शहर पोलिसांना वर नमूद आरोपी १ ते ३ विरुध्द भा.द.वि. कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश केलेले आहेत. सदरकामी शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे यांचेमार्फत ॲड. श्री. आर. यु. वैदय व ॲड. श्री. के. पी. राऊत यांनी काम पाहिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: