बार्शीतील विलगीकरण कक्षामधून कोरोनाबाधित युवतीचे कुटुंबीयांच्या मदतीने पलायन; बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

बार्शीतील विलगीकरण कक्षामधून कोरोनाबाधित युवतीचे कुटुंबीयांच्या मदतीने पलायन; बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

बार्शी : कोरोनाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल होण्यास विरोध करुन एका युवतीने कुटुंबियांच्या मदतीने पलायन केल्याची गंभीर घटना बार्शीतील विलगीकरण कक्षामध्ये घडली आहे.

याबाबत विलगीकरण कक्षामध्ये काम करणार्‍या नर्स गौरी सचिन हराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत.

शहरातील मांगडे चाळ येथील एका व्यक्तीचा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे रुग्णालयाने कळविल्यानंतर मयत रुग्णाच्या कुटूंबातील पाचजणांना येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. त्यांचे स्वॅब तपासणीस पाठविले होते.

त्यातील 24 वर्षे वयाच्या मुलीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिला तातडीने विलगीकरण कक्षातून पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, असे आदेश तालुका अरोग्य अधिकार्‍यांनी दिले होते. त्यामुळे विलगीकरण कक्षातून तिला कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि नर्स त्या रुग्णाकडे गेल्या असता त्या युवतीच्या कुटुंबातील अन्य नातेवाईकांनी त्यांच्याशी वादावादी करून कोरोनाबाधित युवतीला कोविड सेंटरमध्ये स्थलांतर करण्यास नकार दिला.

त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांना दिली. त्यांनी विलगीकरण कक्षात येवून पाहणी केली असता कोरोनाबाधित रुग्ण तेथे आढळून आला नाही. तिच्या नातेवाईकांनी आम्ही तिला पळवून लावले असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला एकच धक्का बसला. त्या पाच जणांविरोधात मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करून व कोवीड 19 या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातकी कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: