चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईची अडीच कोटींची फसवणूक; आरोपी अटकेत

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे  यांच्या आईची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी  आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तापस घोष असे आहे.

नागपूर पोलीस झोन २च्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी सांगितले की, आरोपी तापस घोष याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

केअरटेकरवर फसवणुकीचा आरोप

सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांनी ऑगस्ट महिन्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नागपूर येथे आकाशवाणी चौकात त्यांचे वडिलोपार्जित ‘सीझन लॉन’ आहे. हे लॉन लग्नकार्य तसेच इतर कार्यांसाठी भाड्याने दिले जाते. गेल्या १२ वर्षांपासून तापस घोषला हे लॉन चालवण्यासाठी दिलं होतं.

तापस घोष हाच लॉनचे भाडे आणि इतर आर्थिक व्यवहार करत होता. मुक्ता बोबडे या वयोवृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत तापस घोष याने भाडे म्हणून मिळणाऱ्या रक्कमेच्या बनावट पावत्या बनवल्या आणि हेराफेरी केली. एकूण २.५ कोटी रुपयांची आरोपीने फसवणूक केली आहे.

आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच बोबडे कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी कारवाई करत आरोपी तापस घोष याला अटक केली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: