Breaking – अखेर फरारी रवींद्र बऱ्हाटेच्या मुस्क्या आवळल्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई

ग्लोबल न्यूज: जमीन लाटण्यासह फसवणूकप्रकरणी मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या मुस्क्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. मागील दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बऱ्हाटेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने सुटेकचा निःश्वास टाकला आहे. त्याला पकडण्यासाठी विविध पथकांकडून खास प्लॅन करण्यात आला होता. सोशल मीडियाद्वारे अ‍ॅक्टीव झाल्यानंतर त्याला वेसण घालणे पोलिसांना शक्य झाले.

शहरातील अनेक नागरिकांची फसवणूक करून त्यांची जमीन बळकाकविणे, धमकी देऊन प्रॉपर्टी स्वतःसह टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना भीक न घालणाऱ्याना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यासह संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांकडून टास्कफोर्स प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्याचा सोशल मीडिया हँडल करणारे लोक, छुप्या पद्धतीने फोनवर संपर्क साधणारे, त्याशिवाय त्याने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडिओ वारंवार पाहून लाईक करणाऱ्याची कुंडली तपासण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकांकडून बऱ्हाटेच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

त्यानुसार आज त्याला अटक करण्यात यश आले आहे.
खंडणी, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या 12 गुन्हयांमध्ये बऱ्हाटे दीड वर्षांपासून फरार आहे. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये त्याच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी त्याने फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून पोलिसांवर आरोपी केले होते.

त्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेला मदत करणाऱ्याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन पोलिसांनी बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि मुलगा मयूरला अटक केली. चौकशीत फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओसंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी अ‍ॅड सुनील मोरे यांनीही बऱ्हाटेला मदत केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर बऱ्हाटेला पकडण्यासाठी पोलिसांकडून रात्रंदिवस शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. तो एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मोठ्या फौजफाट्याने बऱ्हाटेला ताब्यात घेउन अटक केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: