तृणमूल ला पर्याय भाजपा पण ममताना पर्याय कोण ? हा प्रश्न अनुत्तरीत म्हणून दिदींचा मोठा विजय

तृणमूल ला पर्याय भाजपा पण ममताना पर्याय कोण ? हा प्रश्न अनुत्तरीत म्हणून दिदींचा मोठा विजय.
——-

सुदर्शन हांडे

आज पाच राज्यांचा निवडणूक निकाल लागला सर्वच ठिकाणच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन, जे लढले हरले त्यांचे पण अभिनंदन करण त्यांनी ही समाजातील त्यांची लोकप्रियता सिद्ध केली आहे. आज विशेष अभिनंदन ममता बॅनर्जी यांचे. भाजपने सर्वस्व पणाला लावून बंगाल मध्ये हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यात काहीअंशी यश ही मिळवले पण ममता यांच्या 200+ जागाना ते किंचितही धक्का लावू शकलेले नाहीत. प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. या राजकीय युद्धातही सर्वच पक्षानी साम, दाम, दंड भेद ही अस्त्र वापरली आहेत. पाचही राज्यात नवीन सरकारे स्थापन होतील त्यांचे कार्य सुरू होईल.

पण या निवडणूक निकालाने खऱ्या अर्थाने भाजपा व काँग्रेस ला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काँग्रेस ने एका मागून एक राज्य गमावली आहेत आणि भाजपा एका मागून एक राज्य मिळवत असताना त्यांच्या विजयाचा अश्व ममता यांनी अडवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बंगाल मधून अनपेक्षित यश मिळाले. त्या यशामुळेच भाजपला बंगालची आत्ता खुणावत होती. पण लोकसभा निवडणुकीत मतदारांसमोर मोदी यांचा चेहरा होता. केंद्रातील सरकार निवडतोय याची जाणीव मतदारांना होती. भाजपा हा केडर बेस पक्ष म्हणून ओळखला जातो.

 

भाजपा कोणत्याही निवडणुकी आधी त्याठिकाणी ग्राउंड लेव्हलला वातावरण तयार करतो हे या पक्षाचे वैशिष्ट्य. यालाच जोड मिळाली आहे ते मोदी यांच्या चेहऱ्याची. मोदींचा चेहरा आणि केडर बेस काम या दुहेरी संगमातून कोणत्याही अवघड विजयला आज पर्यंत भाजपने गवसणी घातली होती. उत्तरेकडील राज्यात लढताना ग्राउंड लेव्हलला उत्तम संघटन असल्याने राज्यातील कोणताही चेहरा न देता विजय मिळवून नंतर राज्याचा नेता ठरवलेले आज पर्यंत पाहिले.

पण बंगाल मध्ये भाजप नेमके दोन्ही ठिकाणी चुकली. बंगाल मध्ये जनतेने लोकसभेला मोदींवर विश्वास दाखवला उत्तम संघटन नसतानाही तब्बल 18 जागा निवडून दिल्या. भाजप याच हवेवर विधानसभेचे दरवाजे उघडायला निघाले होते. प्रचार सभा, रोड शो च्या माध्यमातून प्रचारात आघाडीवर ही दिसत होते. ग्राउंड लेव्हलला तृणमूल एवढे प्रबळ संघटन त्याच्या जवळ नव्हते. उमेदवारी देताना निवडून येण्याची पात्रता हा मूळ हेतू असला तरी नावख्याना किंवा पक्ष कार्यकर्यांना प्राधान्य न देता तृणमूल मधील आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. ज्या नेत्यांना बंगालची जनता पर्याय हुडकत होती तेच नेते ऑप्शन म्हणून दिले. त्यामुळे ऐन वेळी बंगालच्या मतदाराने दिदींच बरी असा जनादेश दिला आहे.

भाजपने इतर राज्यांप्रमाणे इथेही मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा दिला नाही आणि हीच दुसरी मोठी चूक होती कारण निवडणूक राज्याची होती ममता यांना पर्याय कोण असा प्रश्न मतदारांच्या मनात घोळत राहिला. भाजपा बंगाल मध्ये दुबळा पक्ष होता म्हणून त्यांनी नेतृत्वाचा अंतर्गत वाद नको म्हणून चेहरा देने टाळले, कदाचित राज्यातील चेहरे ममता यांच्या एवढे लोकप्रिय नव्हते. पण तृणमूल ला पर्याय भाजपा होती पण ममताना पर्याय कोण ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. भाजपाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला असता तर कदाचित निकाल काही अंशी भाजपसाठी चांगले असते. असो 3 वरून 70+ अशी झेप घेणारा भाजपा नक्कीच कौतुकास पात्र आहे. पण आजचा दिवस ममता दिदींचा आहे. पुन्हा एकदा दिदींचा खूप खूप अभिनंदन.
——
सुदर्शन हांडे, बार्शी.

ग्लोबल न्युज नेटवर्क: