भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तृणमूलच्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणी अटक

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील अनेक खासदार आणि माजी मंत्र्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पक्ष सोडून गेलेल्या अनेकांनी पुन्हा एकदा तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यातच तृणमूल पक्ष सोडून भाजपात सामील झालेले तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

दरम्यान, मुखर्जी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते पक्षात सक्रिय नव्हते, असा दावा भाजप नेते सुजित अगस्थी यांनी केला. त्यांच्यावरील आरोप ते तृणमूलमध्ये होते तेव्हाचे आहेत. सरकार आता जागे झाले, का असा सवालही त्यांनी केला. मुखर्जी पश्चिम बंगालमधील बिष्णूपूरचे माजी आमदारही आहेत. २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष असताना ई-टेंडर व इतर प्रकरणातील आर्थिक अनियमततेच्या आरोपावरून त्यांना पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी नऊ कोटी ९१ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. बिष्णूपूर पोलिस ठाण्याने याबाबत तपास केला होता.तपासादरम्यान मुखर्जी पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, त्यांना अटक केली, अशी माहिती बंकुराचे पोलिस अधीक्षक धृतिमान सरकार यांनी दिली. यावर अद्यापही तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Team Global News Marathi: