मोठी बातमी | छत्रपती संभाजीराजें आज घेणार राष्ट्रपतींची भेट

 

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे आज, दि. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते.

संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

Team Global News Marathi: