Big Breaking: अंबानींच्या घराबाहेरील कारच्या मालकाचा मुंब्रा खाडीत मृतदेह सापडला

अंबानींच्या घराबाहेरील कारच्या मालकाचा मुंब्रा खाडीत मृतदेह

 मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोटकं सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालक मनसुख हिरेन याचा आज संशयास्पद मृत्यू झाला आहे.

त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचे आज विधीमंडळातही पडसाद उमटले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी सभागृहात केली आहे.

ज्या गाडीत स्फोटकं होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे की, माझी गाडी बंद पडली पण क्रॉफर्ड मार्केटला कामासाठी गेलो त्यावेळी ती गाडी गायब होती. मनसुख हिरेन यांना सुरक्षा दिली पाहिजे ही मागणी सभागृहात काही वेळा पूर्वी केली होती, आणि आत्ता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. या सगळ्या प्रकरणामध्ये गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस NIA कडे ट्रान्सफर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: