भारतात लवकरच 6G सेवा सुरु करणार, पंतप्रधान मोदी करणार लवकरच घोषणा

 

देशभरात ऑक्टोबरपासून 5जी सेवा सुरू होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेटवर्कच्या नव्या जनरेशनची घोषणा केली आहे. २०३० पर्यंत भारतात 6जी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे.

5जी सेवा देशभरात सगळीकडे पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2022’मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कृषी आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील तरुण मंडळी नवीन उपक्रमांवर काम करू शकतात. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात 6G लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये भारतीय पर्यायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार जी गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिवसेंदिवस वाढत चाललेली नवी क्षेत्र आणि नवी आव्हानं पाहता आता नव्या संशोधनाची गरज भासू लागली आहे. त्यांनी संशोधकांना कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. भारतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत 5जी सेवा कार्यान्वित होईल. ही सेवा स्वस्त आणि सुकर असेल, असा दावा सरकारने केला आहे. त्यांनी तरुण संशोधकांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर, 5G लाँच आणि गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारख्या उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यास सांगितले.

Team Global News Marathi: