बाबा रामदेव कोरोना लस घेण्यास झाले तयार, डॉक्टरांना संबोधले ‘देवदूत’

डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बाबा रामदेव चांगलेच चर्चेत होते. बाबा रामदेव म्हणाले होते, की त्यांना कोरोना लसीची गरज नाही. कारण, त्यांच्याकडे योगा आणि आयुर्वेदाचं संरक्षण आहे. मात्र, गुरुवारी त्यांनी आपल्या पहिल्या वक्तव्यावरुन यु-टर्न घेत आपण कोरोना लस घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच डॉक्टर देवदूत असल्याचंही म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांनी कोरोना संसर्गबाबत बोलत ऍलोपॅथी औषधांच्या साईट इफेक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यानंतर वादाला सुरुवात झाली होती. मेडिकल क्षेत्रातील लोक बाबा रामदेव यांच्यावर नाराज होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आणि यानंतर बाबा रामदेव यांनी या निर्णयाचं स्वागत करत, सर्वांनी कोरोना लस घ्यायला हवी असे वक्तव्य केले होते.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन योग आणि आयुर्वेदाच्या डबल प्रोटेक्शनचा लाभ घ्या. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही. यावेळी तुम्ही लस कधी घेणार, यावर उत्तर देताना ते म्हणाले, की लवकरच. बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथी डॉक्टरांचं कौतुक करण्यासोबतच ते देवदूत असल्याचंही म्हटलं आहे.

तसेच यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत सुरू असलेल्या वादाबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. याबाबत बोलताना ते म्हणाले,की कोणत्याही संघटनेसोबत माझी दुश्मनी असू शकत नाही. मी केवळ औषधांच्या नावानं सुरू असलेल्या लोकांच्या शोषणाविरोधात होतो, असं त्यांनी म्हटलं होत. आता त्यांच्या या वक्तव्यावमुळे मेडिकल असोसिएशनसोबत सुरु असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

Team Global News Marathi: