नात्यांमधला अकृत्रिम जिव्हाळा…

नात्यांमधला अकृत्रिम जिव्हाळा…

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढलीय. तिला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. तमिळनाडू, केरळमधून ही यात्रा कर्नाटकात आल्यानंतर सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्या. ७५ वर्षे वयाच्या सोनिया गांधी अलीकडची काही वर्षे सतत आजारी असतात. ब-याच काळापासून त्या सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी झालेल्या नव्हत्या. गुरुवारी त्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाल्या. प्रकृती साथ देत नसतानाही काही काळ राहुलसोबत चालल्या.

यादरम्यानच्या दोन प्रसंगांनी काळीज हेलावून टाकले. एक प्रसंग आहे राहुल आईच्या पायातल्या बुटाची लेस बांधतानाचा. दुसरा प्रसंग आहे सोनियाजी चालत असताना त्यांच्या काळजीने त्यांना थांबवून गाडीत बसण्याचा आग्रह करणा-या राहुलचा. दोन्ही सहज घडलेले प्रसंग होते. प्रसिद्धीसाठी घडवून आणलेले इव्हेंट नव्हते. मायलेकामधल्या जिव्हाळ्याचं दर्शन घडवणारे हे प्रसंग होते.

यानिमित्तानं अशाच एका प्रसंगाची आठवण झाली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कारासाठी लोक जमले होते. शरद पवारही तिथं होते. अंत्यदर्शन घेऊन जागेवर परतल्यानंतर शरद पवार खुर्चीत बसल्यावर वाकून पायात बूट घालण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा जवळच असलेल्या सुप्रिया सुळे लगेच खाली बसल्या आणि त्यांनी शरद पवार यांना पायात बूट घालण्यास मदत केली. त्याचवेळी तिथूनच देवेंद्र फडणवीस पुढे निघाले होते. पण सुप्रिया सुळे पवारांच्या पायात बूट घालत असताना देवेंद्र फडणवीसही काही काळ बाजूला थांबून राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नात्यांमधल्या या अकृत्रिम जिव्हाळ्याने सगळेच भारावून गेले. कितीही मोठी झाली तरी माणसं नात्यांमध्ये किती घट्ट बांधलेली असतात, हेच राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्या उदाहरणांवरून दिसून आले.

राहुल गांधी यांच्या मातृप्रेमाचे आणखी एक उदाहरण आहे. जी-२३ गटाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यासुमारास मी राजीव सातव यांच्याशी फोनवर बोललो होतो. त्यांनी त्यामागचे सगळे राजकारण उलगडून सांगितले. त्यावेळी मी त्यांना सहज म्हणालो, `महाराष्ट्रात तुमचा पक्ष सरकारमध्ये आहे. मुंबईने करोनावर चांगले नियंत्रण मिळवले आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी धारावीत येऊन जायला हवे होते`.

त्यावेळी त्यांनी राहुल गांधींसंदर्भातली जी वस्तुस्थिती सांगितली, तो हेलावून टाकणारी होती.

करोना काळात सोनिया गांधी सतत आजारी असायच्या. करोनामुळे दहा जनपथवरील नोकरवर्गही यायचा बंद झाला होता. त्यावेळी सोनियाजींची सगळी काळजी एकटे राहुल गांधी घेत होते. अगदी जेवण बनवण्यापासून घरातील सगळी कामे राहुलच करीत होते. सोनियाजींना काहीकाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तिथे तेच सोबत थांबले होते. संसर्ग टाळण्यासाठी ते बाहेर फिरतही नव्हते आणि कुणाला भेटतही नव्हते. त्यामुळं अनेकांचे गैरसमज होत होते. राहुल गांधींना ते कळत होतं. परंतु आई हा त्यांचा वीक पॉईंट आहे आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय. दुसरं म्हणजे आपल्या व्यक्तिगत भावनांचं भांडवल करण्याचा त्यांचा स्वभाव नाही.

आजच्या कर्नाटकातल्या प्रसंगांवरून मायलेकांमधल्या जिव्हाळ्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

– विजय चोरमारे

ग्लोबल न्युज नेटवर्क: