ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाऊन ची घोषणा ; इंग्लंडच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. या चिंताजनक परिस्थितीमुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियोजीत भारत दौरा रद्द केला. या संदर्भात इंग्लंडकडून भारत सरकारला औपचारिकरित्या माहिती देण्यात आली. (UK PM Boris Johnson cancelled India tour)

कोरोनामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. जॉन्सन यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारल्याचे कळवले होते. पण कोरोना संकटामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला.

दिल्लीत असताना इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक रॉब यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन जानेवारी २०२१ मध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले होते. पण कोरोना संकटामुळे हा दौरा अडचणीत सापडला. कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये चार हजारपेक्षा जास्त वेळा बदल (म्युटेशन) झाले आहेत. मागील काही दिवसांत प्रचंड वेगाने विषाणूच्या रुपात  बदल झाले. प्रत्येक स्वरुपातला विषाणू हा संसर्ग वाढवत आहे.

संसर्ग वेगाने वाढवणारे कोरोना विषाणूचे हे ताजे अवतार इंग्लंडमधील संकटाची तीव्रता दररोज वाढत आहेत. डिसेंबर महिन्यात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांना कोरोना विषाणूच्या नव्या घातक अवताराची बाधा झाली आहे.

विषाणूत झालेल्या ताज्या बदलांनंतर कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे इंग्लंडने लसीकरण सुरू असले तरी देशात लॉकडाऊन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये नाताळ, सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्याचा कार्यक्रम या सर्व कार्यक्रमांवर कडक बंधने आली. यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. इंग्लंडमध्ये सध्या कठोरपणे लॉकडाऊन राबवले जात आहे.

नव्या विषाणूची संसर्ग वेगाने पसरवण्याची आणि निरोगी शरीरात स्वतःचा प्रभाव अल्पावधीत निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. इंग्लंडमध्ये डिसेंबर महिन्यात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांना घातक कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाचे विषाणू नाकावाटे अथवा तोंडावाटे शरीरात जाण्याचा सर्वाधिक धोका आहे. लसीकरणाद्वारे कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न इंग्लंडमध्ये सुरू आहे. पण नव्या स्वरुपातील विषाणूसमोर कोरोनाची लस किती प्रभावी ठरेल याविषयी इंग्लंडचे आरोग्य मंत्रालय साशंक आहे.

अनेक देशांनी इंग्लंड सोबतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. काही देशांनी इंग्लंडमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर अँटी जेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंग्लंडमधून येणाऱ्या प्रत्येकासाठी अनेक देशांमध्ये किमान दोन आठवड्यांच्या क्वारंटाइनचे बंधन लागू आहे. ताज्या घडामोडींमुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कोरोना संकट हा प्राधान्याचा विषय झाला आहे. याच कारणामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला.

कोरोना संकटावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते तर  इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा झाला असता. जॉन्सन भारत दौऱ्यावर आले असते तर तब्बल २८ वर्षांनंतर इंग्लंडचे पंतप्रधान भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे झाले असते. याआधी १९९३मध्ये इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. जॉन्सन यांनी भारत दौऱ्याचे आमंत्रण स्वीकारतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२१च्या जी ७ परिषदेचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण कायम आहे. पंतप्रधान मोदी तत्कालीन परिस्थिती पाहून परिषदेसाठी इंग्लंडला जायचे की व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिषदेत सहभागी व्हायचे याचा निर्णय घेतील.

युनायटेड किंगडममध्ये २७ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या युनायटेड किंगडममध्ये आतापर्यंत २७ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी इंग्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात २३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. वेल्समध्ये १५७ हजारांपेक्षा जास्त, स्कॉटलंडमध्ये १३६ हजारांपेक्षा जास्त आणि नॉर्दन आयर्लंडमध्ये ७९ हजार ८७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नॉर्दन आयर्लंड हे सर्व भूभाग मिळून युनायटेड किंगडम हा देश ओळखला जातो. पण सोप्या भाषेत युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांना अनेकजण इंग्लंडचे पंतप्रधान म्हणतात. सध्या इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमोर कोरोना हा प्राधान्याचा विषय आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पंतप्रधानांनी देशात कठोर लॉकडाऊन आणि लसीकरण मोहीम दोन्ही सुरू ठेवले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: