अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस

अनेक समन्स पाठवूनही सातत्याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) गुंगारा देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आता लूकआऊट नोटीस जारी केल्याचे कळते आहे. म्हणजेच अनिल देशमुख हे फरार आहेत, यावर ईडीने शिक्कामोर्तब केले आहे.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप असून त्यासंदर्भात ईडीने ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे म्हटले होते. त्याआधारावर ईडीने आपला तपास सुरू केला होता. अनिल देशमुख यांची काही संपत्ती ईडीने जप्तही केली आहे. त्यांना यासंदर्भात चौकशीसाठी ईडीने पाचवेळा समन्स बजावले, पण त्या समन्सला त्यांनी केराची टोपली दाखविली. यासंदर्भात मागे एकदा व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच समोर येऊ असे म्हटले होते. पण त्यानंतर अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, हे समोर आलेले नाही.

आता ही नोटीस जारी केल्यामुळे देशमुख यांचा शोध ईडी घेऊ शकेल. देशातील विविध विमानतळांना ही नोटीस पाठविण्यात आली असून तिथे देशमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: