…दोन तासानंतर व्हॉट्स अॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात!

…दोन तासानंतर व्हॉट्स अॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात!

जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप ठप्प (WhatsApp Down) झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

अखेर दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सने सुटकेचा नि:श्वास सोडला.

आज, दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. सुरुवातीला, व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये मेसेजचे जात नव्हते.

त्यानंतर वैयक्तिक मेसेजिंगलाही अडचणी जाणवत होत्या. अखेर, ट्वीटरवर व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या ‘मेटा’ कंपनीकडूनदेखील तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र, व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘मेटा’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले होते. ट्वीटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत होते. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत होता. आजदेखील व्हॉट्सअॅप डाउन झाल्याने युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत होता.

मेटाने काय म्हटले ?

व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्याने युजर्स हतबल झाले होते. सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागल्यानंतर मेटाकडून याबाबत भाष्य करण्यात आले. अनेक युजर्सना मेसेज करण्यासाठी अडचणी येत आहेत. आम्ही तातडीने सेवा पूर्ववत करण्यास प्रयत्नशील असल्याचे कंपनीने सांगितले.

दररोज 100 अब्जाहून अधिक मेसेज

जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप ही जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. दररोज 100 अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात. Android मोबाइलवर युजर्स प्रतिदिवस सरासरी 38 मिनिटे WhatsApp चा वापर करतात. भारतात सर्वाधिक WhatsApp चे युजर्स आहेत. भारतात 390.1 दशलक्ष युजर्स आहेत.

व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्यावसाय, नोकरीतही व्हॉट्सअॅपचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सना त्याचा फटका बसला आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: