आजपासून देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, खरेदीसाठी ‘या’ 4 कंपन्या शर्यतीत

 

 

नवी दिल्ली |  टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आज प्रगतीचं आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. आजपासून 5-जी स्पेक्ट्रम च्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव करण्यात येणार आहे. एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. देशातील 5G स्पेक्ट्रमचा लिलाव प्रक्रिया मंगळवारपासून म्हणजेच, आजपासून सुरू होईल. ज्यामध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसह चार कंपन्या बोली लावतील.

 

यादरम्यान 4.3 लाख कोटी रुपयांच्या 72 GHz स्पेक्ट्रमसाठी बोली लावली जाणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून निविदा प्रक्रिया सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाव प्रक्रिया किती काळ चालते हे स्पेक्ट्रमसाठी येणार्‍या बोली आणि बोली लावणाऱ्यांच्या धोरणावर अवलंबून असेल. ऑगस्ट अखेरपर्यंत 5G सेवा देशात सुरू होईल, अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे.

 

5-जी लिलाव प्रक्रिया दोन दिवस चालेल आणि स्पेक्ट्रमची विक्री राखीव किमतीच्या आसपास होईल, अशी उद्योगांना अपेक्षा आहे. स्पेक्ट्रम लिलावाच्या या फेरीत, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया व्यतिरिक्त, गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेस देखील 5G ​​साठी बोली लावणार आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून दूरसंचार विभागाला 70,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

आनंद महिंद्रांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना सलाम, भारतासाठी अभिमानाचा क्षण!

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Team Global News Marathi: