सोमवारपासून बार्शीत ‘भगवंत’ व्याख्यानमाला डॉ. दीक्षित, प्रा. मस्के व सिंधुताई सकपाळ यांची व्याख्याने

गणेश भोळे

बार्शी: मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी व भगवंत मल्टीस्टेट बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत जयंतीचे औचित्य साधून सोमवार दि. 29 एप्रिल ते 1 मे या कालावधीत ‘भगवंत व्याख्यानमाले’चे आयोजन केले असल्याची माहिती दोन्ही संस्थांचे प्रमुख संतोष ठोंबरे यांनी दिली. व्याख्यानमालेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. 

येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता ही व्याख्याने होणार आहेत. सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार असून अध्यक्षस्थानी नंदकिशोर सोमाणी हे असणार आहेत. पहिल्या दिवशी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विना सायास वेट लॉस व मधुमेहावर नियंत्रण’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉ. गणेश सातपुते, मुकुंदराज कुलकर्णी, सतीश अंधारे, अमोल जाधव हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी प्रा. तुकाराम मस्के यांचे ‘शिक्षण, समाज आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी उद्योजक जयचंद सुराणा, गोरख लोळगे, पांडुरंग पाठक व कल्याण आवटे यांची उपस्थिती असणार आहे. 

बुधवार दि. 1 मे रोजी श्रीमती सिंधुताई सपकाळ यांचे ‘आईच्या काळजातून’ या विषयावरील व्याख्यान होत असून यावेळी संजय सोलवट, दिलीप गांधी, विकास भालके, अ‍ॅड. अविनाश जाधव यांची उपस्थिती असणार आहे. 

व्याख्यानमालेचा बार्शीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांनी केले आहे. 

admin: