सोन्याच्या दरात वाढ सुरूच, प्रतितोळा सोन्याचा दर 45 हजारांच्या पार

सराफा बाजारामध्ये सोन्याची किंमत गगनाला भिडली असून सोन्याच्या दराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सोन्याचा आजचा भाव 45 हजारांच्याही वर गेला आहे, तर चांदीचे दरही वाढले आहेत. जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस, शेअर बाजारातील घसरण आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. शुक्रवारी सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने नवा इतिहास रचला आहे.

शुक्रवारी सराफ बाजार उघडताच सोन्याचा दर 44500 रुपयांच्या आसपास होता. दुपारच्या सुमारासह सोन्याचा भाव 45 हजारांच्या पार गेला. सोन्यासह चांदीचा दरही 48 हजारांच्या पलीकडे गेलेला आहे. दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर तोळ्यामागे 910 रुपयांनी, तर चांदीचा दर प्रतिकिलोमागे 700 रुपयांनी वाढला आहे.

गुरुवारी सोन्याचा दर 100 रुपयांनी घसरला होता. येस बँकेवर निर्बंध घालण्यात आल्याने शेअर बाजार 800 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याचा दर 10 ग्राममागे 45510 रुपये झाला आहे, तर चांदीचा दरही प्रतिकिलोमागे 48180 रुपयांवर स्थिरावला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोने-चांदीच्या दरांवर परिणाम

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉवर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याचा भावाचा मोठा परिणाम होतो. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचा दर खाली-वर होताना दिसला आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. याचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर परिणामी सोने-चांदीच्या किंमतीवर होत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण हे देखील सोने-चांदीचे दर वाढण्यामागील कारण असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

46 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता

कोरोनाचे संकट वाढत असल्याने आणि लग्नसराईच्या दिवसातील मागणीही वाढण्याची शक्यता असल्याने सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे आगामी काही दिवसात 46 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: