सुख म्हणजे नक्की काय असतं ? की सुख अस्तित्वात..! वाचा सविस्तर-

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

 सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत महंत सांगत आले आहेत. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी समाजप्रबोधन केलं. तर दुसरीकडे भौतिकवादाच्या मार्गाने चालणाऱ्यानी त्यांच्या त्यांच्या परीने वेगळी चर्चा केली. 

….पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सुखाबाबत काय म्हणणं आहे ?

माझ्या अनेक कार्यक्रमात मी एक वाक्य आवर्जून सांगतो, “मागितल्यावर मिळतं त्याला भीक म्हणतात तर न मागता मिळतं त्याला सुख म्हणतात !” बघा नीट विचार करून, आयुष्यात अनपेक्षित मिळालेल्या गोष्टीचं जास्त सुखावतात की नाही ! घरात एसी लावून मिळालेल्या गारव्यापेक्षा भर उन्हातून चालताना अचानक आलेली गार वाऱ्याची झुळूक सुखावते न ? गड चढताना खूप तहान लागलेली असताना कोल्ड ड्रिंक विकत घेऊन पिण्याआधी समोर आलेला फेसाळलेल्या ताकाचा पेला सुखावतो न ? कामावरून दमून घरी आल्यानंतर चहाचा कप यायच्या आधी लहान मुलाने धावत येऊन मारलेली मिठी सुखावते न ? दिवसभर फराळाचं करून दमलेल्या बाईला न सांगता नवरा ओटा आवरायला मदत करतो तेव्हा ती सुखावतेच न ? बस स्टॉपवर न ठरवता ‘आपलं माणूस’ दिसतं तेव्हाही माणूस सुखावतोच न ? अशा एक न दोन, अनेक गोष्टी आठवून बघा, सुख असं कुठेही अचानक सापडून जातं.

फक्त जे सापडलंय तेच सुख आहे हे मात्र ओळखता आलं पाहिजे. ते ओळखता येत नाही याचं मुख्य कारण मी माझ्या आयुष्यातले सुखाचे कण वेचायचं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यातल्या सुखाचे क्षण तपासात बसतो, आणि “भला मेरी कमीज से उसकी कमीज सफेद कैसी ?” असं म्हणत स्वतःचं सुख हरवून बसतो.

सुख हे असं खूप सोपं असतं. ते चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे असतं, तर कधी कधी ते मित्रांच्या मैफिलीत “ऑन द रॉक्स” सुद्धा सापडतं. दारासमोर लावलेल्या बीएमडब्ल्यूत ते असतं तर कधी शेतातून जाणाऱ्या बैलगाडीतही असतं. महिन्याच्या शेवटी आलेल्या “your a/c credited by rs….” ह्या मेसेजमध्ये ते सापडतं तसं पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करताना पण सापडतं.

"सुखी माणसाचा सदरा" हा शब्द ज्याने लिहिला त्याला मला सांगायचंय की बाबा रे, मुळात सुखी माणसाचा असा सदरा वगैरे काही नसतो. मिळेल त्या वस्त्रात, प्रसंगी वस्त्राशिवायही तो सतत सुखीच असतो. नेमकं असा सदरा शोधण्याचा नादातच नव्वद टक्के लोकं दुःखी होतात. माझं तर एकच सांगणं आहे, तुम्हाला सुखी व्हायचंय न, मग तुम्ही दुसऱ्याचं दुःख बघायला शिका. तुम्हाला आपोआप कळेल की आपण किती सुखी आहोत ते ! कुष्ठरुग्णाची झडलेली बोटं बघून माझी वीस बोटं मला सुखावून जातात. वृद्धाश्रम बघितल्यावर मला माझा मुलाबाळांनी भरलेला वन बीएचके सुखावून जातो. व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण बघून माझा प्रत्येक श्वास मला सुखावून जातो ! अशा अनंत गोष्टी मला सुखावून जातात !



सुख खूप सोप्पं आहे, फक्त "मी सुखीच आहे" असं मला म्हणता आलं पाहिजे, बस ! अहो, आपल्या पोस्टला पाच पन्नास लाईक्स आले तरी सुखावणारी माणसं आपण, तितक्याच सहजपणे आयुष्यातले लाईक्स मोजून सुखी व्हायला काहीच हरकत नाही ! बरोबर न ?
ग्लोबल न्युज नेटवर्क: