सत्ताकोंडी फुटणार? शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप मोठा पक्ष असला तरीही सत्ता स्थापन करण्याऐवढे बहुमत त्यांच्याकडे नाही. दरम्यान संजय राऊतांकडून वारंवार भाजपवर निशाणा साधला जात आहे. भाजपने शिवसेनेसोबत जुळवाजुळव केली नाही तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान संजय राऊतांनी काँग्रेसवर स्तुती सुमनं उधळली आहेत. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 15 दिवसांपासून निर्माण झालेली सत्ताकोंडी फुटण्याची चिन्हं आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे.  

सोनिया गांधी या शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याकरिता तयार नसल्या तरी काँग्रेस आमदारांचा दबाव वाढला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. यात पुढील सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे.

भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या वादामुळं राजकीय तिढा निर्माण झाल्यानंतर भाजपकडून आमदार फोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं खबरदारी म्हणून काँग्रेसनं आपल्या आमदारांना जयपूर इथे हलवले आहे. काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेतेही आज जयपूरला पोहोचले. तिथं सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अपवाद वगळता सर्व आमदारांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास होकार दर्शवल्याचं समजतं.

शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तास्थापनेसाठी हालचाली न केल्यास भारतीय जनता पक्ष विरोधकांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतो. याआधीही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार व नेते फोडले आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: