संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा, म्हणाले आता चर्चा फक्त POK वरच होईल


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातलेली नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले

नवी दिल्ली | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कलम 370 हटवल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानला इशारा दिला आहे. भविष्यात भारत पाकिस्तानसोबत केवळ PoK (पाकव्याप्त काश्मीर) या एकमेव मुद्द्यावर चर्चा करेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. राजनाथ सिंह यांनी गेल्या काही तासांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट होते.


हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जन आशीर्वाद यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानसंदर्भात हे वक्तव्य केले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. त्यामुळे ते संपूर्ण त्याचे रडगाणे सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातलेली नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

पुढे बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, आतापर्यंत कलम 370 ला कोणीही हटवू शकले नाही. कोणीही या कलमला हात लावू शकणार नाही, असे लोकांना वाटत होते. मात्र भाजपने त्याला धक्का लावला. आता भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असेही अनेकजण म्हणत होते. मात्र, आम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये कलम 370 रद्द केला.

आम्ही कधीही सत्तेचे राजकारण केलेले नाही आणि करत नाही. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तसे वचन दिले होते आणि जीव गेला तरी ते पूर्ण करायचे हा भाजपचा निर्धार होता, असे राजनाथ यांनी म्हटले. 
कलम 370 हे काश्मीरच्या विकासात मोठा अडथळा होता. त्यामुळे ते हटवण्यात आले आहे.

मात्र सध्या पाकिस्तान हा भारताने ही चूक केली असल्याचे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद PoK प्रश्नावरही होणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: