शिवसेना कधी झुकली नाही, झुकणारही नाही; उद्धव ठाकरे

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उद्देशून बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर, धनगर आरक्षण, महायुतीची कारणं अशा विविध विषयांना हात घातला. तसेच सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांवर तोफ डागत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचसोबत ‘शिवसैनिकांच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण शिवसैनिक ही वाघनखं आहेत. प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत’, असे त्यांनी ठणकावून सांगत इशारा दिला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवतीर्थावर जमले होते. लाखोंचा हा जनसमूदाय म्हणजे जणू शिवसागरच उसळल्याप्रमाणे भासत होता. पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी साऱ्याचे कान आसूसले होते. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी सारे शिवतीर्थ दणाणून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि प्रत्येक विषयावर त्यांनी खणखणीत भाष्य केले.

‘सत्ता तर पाहिजेच. आहे युती केली, कुणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली असं वाटलं असेल. शिवसेना कधी झुकली नाही, झुकणारही नाही, लाचारही होणार नाही. शिवसेना फक्त शिवप्रभूंसमोर नतमस्तक होईल’, असं खणखणीत शब्दात त्यांनी सांगितले. ‘पण चंद्रकांत पाटील मध्ये म्हणाले होते आमची अडचण समजून घ्या. तुमची अडचण समजून घेतली,  आता तुम्ही महाराष्ट्राची अडचण समजून घ्या. आम्ही आहोत तुमच्यासोबत’, असेही ते म्हणाले.

‘आज शस्त्र पूजनाचा दिवस आहे. समोर जे शिवसैनिक बसले आहेत ही माझी तलवार आहे. ही अन्यायाविरुद्ध वार करणारी तलवार आहे. गोरगरीबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ही माझी ढाल आहे. आणि प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत. कुणी कुणी कशाचा अनुभव घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाघ नखाने गुदगुल्या नाही करता येत, वाघनखं ही कोथळा बाहेर काढतात. म्हणून मी सांगतोय की बाबांनो आमच्या शिवसैनिकाच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, असं म्हणत त्यांनी दगाफटका करणाऱ्यांना खणखणीत इशारा दिला.

चांगला कारभार करण्यासाठी आपणसोबत आलो आहोत. का नाही करायचा चांगला कारभार? शिवसेना – भाजपची युतीमध्ये मधल्याकाळात जे काही चाललं होतं त्यावर बोलताना ते म्हणाले, मी एकूण लोकसभेच्यावेळी विचार केला, जे वातावरण होतं या देशात की कुणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. मग कुणाचं सरकार आपल्याला चाललं असतं? शरद पवार पंतप्रधान चालले असते, का मुलायम सिंग चालले असते का चंद्राबाबू चालले असते की मुफ्ती महम्मद, नितीश कुमार आणखी कोण चाललं असतं तुम्हाला. मायावती चालल्या असत्या.

म्हणून मी विचार केला की त्यावेळेला अस्थिर लोकसभा आली असती आणि मग आपण काय केलं असतं. मग तेव्हा आपली जी काय ताकद आहे ती नक्कीच मी काँग्रेसच्या मागे कदापी उभी राहू दिली नाही, देणार नाही. त्यालाही कारण आहे. मग आपण भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी युती करायची मग आधीच करून मजबूत सरकार का आणायचं नाही? जे आपण आणलं. करायचं ते उघड उघड करायचं. लपून छपून करायची औलाद शिवसेनेची नाही. करू ते उघड करू. प्रेमही उघड करू आणि वैर सुद्धा आम्ही उघड करू’, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी राममंदिराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आपली भूमिका अगदी स्पष्ट आणि ठाम शब्दात मांडली. ‘राम होते, रामाने रावणाचा वध केला हे सगळ्यांना मान्य आहे. पण राम होते की नाही, ते अयोध्येत जन्मले का यावर वाद आहे. मला नाही वाटत हे असं जगाच्या कुठल्या कोपऱ्यात चालले असेल का. मध्यंतरी पंतप्रधान बोलले की बोलू नका, कोर्टात केस आहे. आहेच 30 वर्ष केस सुरू आहे. या महिन्यात निकाल लागेल असं म्हणताहेत. जर कोर्टाने चांगला न्याय दिला किंबहुना कोर्ट न्यायच देतं. चांगला आणि वाईट असा काही प्रकार नसतो. तर आनंदच आहे. संपूर्ण देशाला एक वेगळी झळाळी येईल. नाही तर आम्ही ठाम आहोत की, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा. ही आमची मागणी आहे. ती आम्ही सोडत नाही, सोडू शकत नाही’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘राजकारणासाठी राम मंदिर आम्हाला नको. मत मागायला अजिबात नको. संपूर्ण देशाची, हिंदूची मागणी आहे. आम्हाला राम मंदिर हवं कारण “प्राण जाए पर वचन न जाए” ही शिवसेनेची नीती आहे, वृत्ती आहे. वचनाला आम्ही जागतो. जे वचन आम्ही जनतेला देतो, ते वाटेल ते होऊ दे आम्ही पोळतो आणि पाळणार’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘राम सत्यवचनी, एकवचनी होता आणि म्हणून मला राममंदिर पाहिजे. पित्याच्या वचनासाठी ज्याने आपल्या राज्याचा त्याग केला त्या रामाचं मंदिर आम्ही सत्ता मिळवण्यासाठी करू? आम्हाला ते मंदिर एवढ्यासाठी पाहिजे की शिवसेना असेल भाजप असेल मित्रपक्ष असतील, पण आमचा कारभार कसा असेल वचनबद्ध, आम्ही जनतेच्या सेवेसाठी वचनबद्ध आहोत. मग ती वचनं जनतेला दिलेली असतील, एकमेकांना दिलेली असतील ही वचनं जर पाळणार नसू तर ढोंग करण्याचं कारण नाही. मग राम मंदिर बांधायचे आणि वचनं तोडायची हे मला वाटतं की रामाला सुद्धा पटायचं नाही. राम म्हणेल रावणापेक्षा यांना मारलेलं बरं.

आम्ही वचनबद्ध आहोत. हे शिवधनुष्य घेऊन होय आमचं धनुष्य आहेच. हा योगायोग असेल. जेव्हा धनुष्यबाण आपण निशाणी घेतली तेव्हा राम मंदिराचा विषयही नव्हता.

आता धनगराच्या काठीला तलवारीची धार आली पाहिजे

परवा मला एका कार्यक्रमाता काठी आणि घोंगडं दिलं. मात्र ती नुसती काठी नाही राहिली पाहिजे. आता तुमच्या धनगराच्या काठीला तलवारीची धार असली पाहिजे. आता जरा सावधा व्हा. तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’, अशी धार त्या काठीला असली पाहिजे.

आरक्षणासाठी लढूच

मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. धनगर समाजालाही तसंच द्या, आदिवासींचं काही कमी न करता द्या आणि ते आम्ही द्यायला लावणार. या देशावर प्रेम करणारे मुसलमान जरी आमच्या सोबत आले तरी आम्ही त्यांचे सुद्धा न्याय हक्क त्यांना मिळवून देऊ. शिवरायांच्या सोबत काही देशभक्त मुसलमान सुद्धा होते. मोगलांच्या वादळात अठरापगड जातींना भगव्या झेंड्याखाली एकत्र करून दिल्लीचं तख्तही हलवलं, अटकेपार झेंडा लावला हा चमत्कार या माती मध्ये जन्माला आला आहे. याचे आपण नुसतं पोवाडे गात राहिलो तर शिवराय म्हणतील हे मी कुणासाठी केलं. हा शिवरायांचा महाराष्ट्र कुणाचीही हाजी हाजी करणारा नाही, असे ही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: