विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी 14 दिवस महत्वाचे : इस्रो प्रमुख के. सिवन

चांद्रयान-2 मोहिमेच्या अंतिम टप्प्यात लँडिंग करण्याच्या दोन किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र, अजून विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शक्यता असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी स्पष्ट केले. पुढील 14 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असून या काळात विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सिवन यांनी शनिवारी सांगितले.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. संपर्कात असेपर्यंत विक्रम उत्तमप्रकारे काम करत होता, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ही मोहिम यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. आता 14 दिवसात विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गगनयानसह इस्रोच्या आगामी मोहिमाही ठरलेल्या वेळी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी पुढील 14 दिवस महत्त्वाचे असले तरी काही तज्ज्ञांच्या मते विक्रमने चंद्रावर क्रॅश लँडिग केल्याची शक्यता वर्तवली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे आणि ऑर्बिटरच्या मदतीने त्याबाबतची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच लँडरच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डरद्वारे विक्रमशी संपर्क का तुटला याची कारणेही शोधण्यात येत आहेत. विक्रम ज्या गतीत होता. त्याच गतीत त्याने चंद्रावर क्रॅश लॅडिंग केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. विक्रम लँडरच्या बाजूला लावण्यात आलेल्या चार स्टियरिंग इंजिनपैकी एखादे बंद पडल्याने तो मार्ग भरटल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विक्रम लँडरने चंद्रावर क्रॅश लँडिंग केली असेल तर ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या छायाचित्रांच्या आधारे त्याचे किती नुकसान झाले आहे, ते समजणार आहे. मात्र,आता पुढील 14 दिवस महत्त्वाचे असून या काळात विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

विक्रम लँडरशी संपर्क तुटला म्हणजे त्याचे क्रॅश लॅडिंग झाले असे समजणे योग्य नसल्याचे मत इस्रोचे माजी संचालक डी. शशीकुमार यांनी सांगितले. विक्रम लँडर आणि ऑर्बिटरमधील कम्युनिकेशन चॅनेल सुरू असल्याने विक्रम लँडर क्रॅश झाल्याची शक्यता वर्तवणे योग्य नाही. विक्रम चंद्रावर सुखरुप उतरल्याची शक्यता आहे. मात्र, काही कारणाने त्याच्याशी संपर्क तुटल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ऑर्बिटरकडून अधिक माहिती आल्यावर याबाबत मत व्यक्त करणे योग्य होईल. तसेच विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात यश मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: