विकास कामांच्या जोरावर निवडणूक जिंकणारच — राजेंद्र राऊत

विकास कामांच्या जोरावर निवडणूक जिंकणारच — राजेंद्र राऊत

बार्शी:    बार्शी तालुक्याच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.त्यांच्या या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर मी बार्शी तालुक्यात व शहरात विकासकामे करू शकलो व भविष्यात सुद्धा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे आपला तालुका विकासापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही त्यांनी मला दिलेली आहे.

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पांगरी भागातील जिव्हाळ्याचा चिंचोली ढेंबरेवाडी साठवण तलावाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत गावकऱ्यांशी रात्री सव्वा बारा वाजता फोनवरून संवाद साधून तुमचा साठवन तलाव मी पूर्ण करणारच असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी खरा करून दाखविला. या साठवण तलावाच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले असून थोड्याच दिवसात ते काम सुरू होवून पूर्ण होईल.

उजनी धरणातून मराठवाड्यासाठी जाणार असलेले 21 टीएमसी पाणी बाभुळगाव,बोरगाव,पाथरी, जवळगाव तलावात सोडून त्या भागातील शेतकऱ्यांची शेती हिरवीगार करणारच आहे.असे प्रतिपादन बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केले.

ते पांगरी येथील प्रचार सभेत बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले,नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,बाबासाहेब कथले,अॅड.अनिल पाटील, नवनाथ चांदणे,सुनील अवघडे सुनील वाघमारे,विशाल गरड आदींनी मनोगत व्यक्त केले. या सभेला पांगरीतील गर्दीचा उच्चांक मांडला गेला.

    याउलट या माजी लोकप्रतिनिधींनी चिंचोली ढेंबरेवाडी तलावाच्या कामाचे, प्रत्येक निवडणुकीत यापूर्वी चार वेळा खोटे नारळ फोडून जनतेची दिशाभूल केली. विरोधकांनी तालुक्यातील जनतेची टिंगलटवाळी केली असून निवडणूक जवळ आल्या की पुन्हा आश्वासनांची खैरात करायची  नौटंकीपणा केला जात आहे. त्यांचे हे फसवेगिरीचे उद्योगधंदे, खोटारडेपणा आता उघड झाला असून जनता त्यांना माफ करणार नाही.या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून त्यांचा पराभव निश्चितच करणार याची मला खात्री व विश्वास झाला असून ही निवडणूक आता जनतेने ताब्यात घेतली आहे. विरोधकांचा पराभव करण्यासाठी जनता ही पेटून उठलेली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: