वक्तृत्व कला आत्मसात करण्याची गरज : ना. सुभाष देशमुख मुंबई चा सतीश कांबळे विजेता तर बार्शीचा सुरज तवले द्वितीय

बार्शी: समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी वक्तृत्व कला आत्मसात करून घेणे गरजेचे असून, वक्तृत्व स्पर्धांमधून देशहिताच्या विषयांवर सर्वसामान्यांचे प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा राज्याचे सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गृहनिमार्ण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या सन्मानार्थ मित्र परिवाराने आयोजित केलेल्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मजा काळे, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, सिनेटर दिनेश चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकामध्ये जिल्हाउपाध्यक्ष अरुण कापसे यांनी वक्तृत्व स्पर्धा संयोजनाचा उद्देश सांगितला.
यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, राजकरणात सक्रीय झाल्यांनतर विविध कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करण्याच्या निमित्ताने माझे वक्तृत्व घडले. भाजपात काम करत असताना अटलजी, अडवाणीपासून प्रमोद महाजनांपर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. वक्तृत्व कौशल्य मिळवणे काळजी गरज आहे हे लक्षात आले. आपले विचार प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत. वक्तृत्व स्पर्धामधून राष्ट्रभक्तीपर विषयांवर विचार मंथन झाले पाहिजे. यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले बोलता आले पाहिजे. बोलणाऱ्याची मातीही विकते अशी म्हण आहे त्यामुळे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता आले पाहिजे. वक्तृत्व स्पर्धांमधून अनेकांना व्यासपीठ मिळते त्यामुळे अशा स्पर्धा गरजेच्या आहेत.


यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी मित्र परिवार आणी कार्यकर्त्यांना केवळ विधायक कार्यक्रम राबवावेत असे सुचवले. विद्यार्थांमध्ये सभाधिटपणा, आत्मविश्वास येण्यासाठी व त्यांना विचार करण्याची सवय लागण्यासाठी वक्तृत्व कलेचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कार्यकर्त्यांने आयोजित केलेल्या उपक्रमाचे मिरगणे यांनी कौतुक केले. मंगेश दहीहांडे यांनी सोशल मिडिया शाप की वरदान या विषयावर श्रोत्यांची मने जिंकणारे प्रात्यक्षिक भाषण केले. यावेळी श्रद्धा रवि शिंदे या आठवीच्या विद्यार्थिनीचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ठ गुण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
उद्घाटनानंतर यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये २१ वे शतक जवळ आलेले जग आणि दूर गेलेली माणसे, चला करू या दुष्काळाशी दोन हात, ग्लोबल वार्मिंग एक जागतिक समस्या, शासकीय मदतीने होतो माणूस सबल की दुर्बल या विषयांवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे झाली. या स्पर्धेत मुंबईचे सतीश कांबळे यांनी ११ हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर बार्शीचे सुरज तवले यांनी व्दितीय क्रमांकाचे ७ हजार रुपायचे पारितोषक व तृतीय क्रमांकाचे ५ हजार रुपयाचे पारितोषिक श्रद्धा शिंदे व शंतनू पवार यांना विभागून देण्यात आले.

admin: