वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर..

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

ही यादी जाहीर करताना प्रत्येक उमेदवाराच्या जातीचा( समाजाचा) उल्लेख या करण्यात आला आहे. एकूण 22 उमेदवारांची ही यादी आहे.

ही यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धी ला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या 70 वर्षात महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांनी प्रथमपासून जातीचे व नंतर कुटुंबशाहीचे राजकारण केले. बहुजन, कारागीर, उद्योजक, अलुतेदार, बलुतेदार जातींना महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारणापासून बेदखल ठेवले, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकास, धोरणात प्रचंड प्रादेशिक सामाजिक असमतोल व शोषण निर्माण झाले. याचे दुष्परिणाम म्हणून आज बेकारी, शेतकरी आत्महत्या, गरीबी, ओला व सुका दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनता बेजार आहे.

ही कुटुंबशाही आणि एका जातीच्या थैलीशहांच्या भ्रष्ट राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढून इथल्या राज्यकारभारात लोकशाही व समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. हे आव्हान स्वीकारून महाराष्ट्रातील मागील लोकसभा निवडणूकीत निवडणूक प्रक्रियेमध्ये सामाजिक लोकशाही आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अतिशय अभिनव व धाडसी पाऊल टकले. गेल्या 70 वर्षात ज्यांना संधी पासून वंचित ठेवले अशा अलुतेदार, बलुतेदार, कारागीर अल्प लोकसंख्या असलेल्या समाजातील गरीब असले तरी गुणवान असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली याचा सामाजिक परिणाम झाला .

या उद्योजक व कारागीर समाजाची आजपर्यंत कोंडून ठेवलेली प्रचंड ऊर्जा महाराष्ट्राच्या समाजकारणात मोकळी होत आहे. विविध सामाजिक गटातील सौहार्द व बंधुभाव वाढला आहे. राजकीय आकांक्षा जागृत होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्याितील प्रदेशात मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भेटताना याचा अनुभव आला असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

  उद्योजक जाती या नेहमीच त्यांच्या व्यवसाय व्यवहाराची आवश्यकता म्हणून  नव्या व आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाची कास धरतात. महाराष्ट्रात या जातींचा अनुभव, ज्ञान, बुद्धीमत्ता व समजदारी चा उपयोग महाराष्ट्राची विकास धोरणे आखण्यासाठी केला पाहिजे, महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक समस्यांवर उपाय योजना करून विकासाला समतेची नवी दिशा देणारा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीतील गुणवान कार्यकर्त्यांच्या टीमने तयार केला आहे. 
ग्लोबल न्युज नेटवर्क: